By Amey Sachin Joag
प्रिय…
खरं तर कोणाला पत्र लिहावं तेच सुचत नाहीये. पण, लिहिल्याशिवाय चैन पडत नाहीये. बाबांना लिहावं तर ते आधीच माझ्यावर चिडलेले आणि आईला लिहावं तर… नको, मीच त्यांना इतकं दुखावलंय, की त्यांना कुठल्या तोंडाने पत्र लिहायचं हाही मोठा प्रश्नच आहे. माझा एखादा जीवलग? पण, असा एखादा माणूस उरलाय कुठे? म्हणजे पर्याय उरला माझाच! पण, असं कुठे असतं का? स्वतःच स्वतःला पत्र लिहीतं का कधी कोणी? पण, असा काही नियम नाही, हो की नाही? म्हणजे स्वतः स्वतःवर प्रेम करू नये, किंवा स्वतःच स्वतःला एखादी भेट देऊ नये असं कुठं म्हणलंय! उलट स्वतःवर प्रेम करा असंच सगळं जग ओरडून ओरडून सांगायला लागलंय आजकाल! तेसुद्धा माझ्यासारखेच असतील असं वाटतंय मला, इतरांवर प्रेम करून आपली चूक उमगलेले, ठेच लागलेले प्रेमी जीव! किंवा कोणाकडून तरी जबर नकार मिळवलेले किरकोळ जंतू. होय, जंतूच! जगात काही लोकांना किंमत नसतेच मुळी. त्यांनी जगात ह्या किड्यांसारखंच विनाकारण यावं आणि किड्यांसारखंच मरावं असा जगाचा अलिखित नियम आहे. खोटं वाटतं? मलाही वाटायचं; पण, आता नाही वाटत. कसंय, प्रत्येकाला आयुष्यात कसली ना कसली किंमत ही मोजावीच लागते- पैसा, संपत्ती, प्रसिद्धी, प्रेम, अगदी जीवसुद्धा! ह्यापैकी काहीतरी मोजवंच लागतं! मीही… असो, तर मुद्दा असा, की मला पत्र लिहायला एकही आप्त उरलेला नाही आणि स्वकीय कोण, ह्या हिशोबात माझ्या फार चुका होत असल्यामुळे निनावी पत्र लिहावं असं माझं मत पडलंय. फारातफार काय होईल? हे पत्र निनावी परत येईल, इतकंच! तसंही माझी आत्ताची ओळख नावाने होणार नाहीचे. काही काळापासून तर एक्झिबीट नंबर एक-दोन करत पस्तीस-छत्तीस अशीच होतीये. थोडक्यात काय, एकतर सरकार दप्तरी माझी नोंद केस नंबर अमुकअमुक अशी तरी होईल, नाहीतर 'हत्याकांड'सारखा आताशा वापरून अत्यंत बोथट झालेल्या शब्दाने तरी होईल. माझी काय, सगळ्यालाच तयारी आहे. म्हणून, ह्याची सुरुवात आत्तापासूनच करावी असं मला वाटतं. तात्पर्य काय, तर ह्या सगळ्या कारणांमुळे हे निनावी पत्र.
आता जिथे पत्राला धनीच नाही, तिथे मायना, मजकूर असल्या गोष्टी कुठून यायला? पण इथेच तर खरी मेख आहे ना! हे जग इतक्या चमत्कारांनी भरलंय, की प्रत्येक गोष्टीत तर्क लावणं, तो पारखून पाहणं आणि वास्तव त्या तर्काच्या कसोटीवरच तोलून घेणं शक्यच नाहीये. हेही पटत नाही? म्हणजे मला अजून सविस्तर सांगणं भाग आहे, नाही का? ठीके. आपण एखाद्यावर प्रेम करतो, त्या व्यक्तीला आपलं सर्वस्व अर्पण करतो. तसंच ती व्यक्तीदेखील आपल्यावर प्रेम करते, आपल्याला सर्वस्व देण्याची शपथ घेते. ह्याचा अर्थ त्या दोघांमध्ये परस्पर विश्वासाचं, सामंजस्याचं आणि त्याहीपलीकडे अतूट धाग्याचं नातं असणार, बरोबर? चूक! आता ही सगळी बडबड झाली तर्काच्या कसोटीवर केलेली वायफळ चर्चा. पण, वास्तव मात्र ह्याहून भलतंच असतं. आता ह्यामध्ये काय नवीन असणार? रोजचंच म्हणायचं हे! गंमत म्हणून एखादं उदाहरण सांगायचं झालं, तर एखादी अत्यंत दुःखद, विरहावर बेतलेली कविता एखाद्याला कविला ऐन लग्नाच्या मांडवात, शुभमंगल सावधानच्या पार्श्वभूमीवर सुचलेली असते. किंवा एखादा संगीतकार एकीकडे एखाद्याची निधनवार्ता पचवत असताना उत्साही गाण्याला चाल द्यायच्या विचारात बुडालेला असतो. अनेक किस्से ऐकतोच की आपण रोज. तसलेच चमत्कार माझ्याही आयुष्यात भरलेत. तेच प्रकर्षाने सांगावेसे वाटले म्हणून हे पत्र.
आज हे पत्र लिहिताना मला अजून एक गोष्ट जाणवली. आपलं कोणीतरी ऐकून घ्यावं ही भावना एखाद्या माणसामध्ये किती प्रबळ असते नाही? म्हणजे, लहान मूल आईचं लक्ष वेधून घ्यायला रडतं आणि आईचं त्याच्याकडे लक्ष गेलं, की बोबडं बोलत, अनेक अक्षरांची असंबद्ध जुळवाजुळव करत बोलत राहतं. वय वाढू लागल्यावर आपला श्रोतृवर्ग बदलतो, त्यांची संख्या बदलते, व्यक्त व्हायचं माध्यमही बदलत जातं. उत्साही, वेडी तरुण माणसं नाटक-सिनेमा वगैरेकडे वळतात. स्वतःला अतिशय संवेदनशील म्हणवणारे लोक स्वतःच्या लेखणीतून काहीबाही लिहून, आजूबाजूला घडणाऱ्या घटनांवर घाला घालायचा प्रयत्न करतात, काही लोक कुठल्यातरी कवितेला गाणं करण्याचा खटाटोप करतात तर उरलेली लोकं इतर कुठल्या मार्गाने बोलू पाहतात. पण, आपण कुठेतरी, कोणापाशीतरी आपल्या मनातलं बोलू शकतोय, कोणीतरी आपलं म्हणणं ऐकून घेतंय ही भावनाच किती आशादायी आहे ना! मलासुद्धा खूप वाटायचं, माझं कोणीतरी ऐकून घ्यावं, मलाही कधीतरी समजून घ्यावं. पण कुणास ठाऊक, तसं कोणालाच माझं बोलणं, रडणं, हसणं, दुखणं, आक्रोश- काहीही ऐकू गेलं नाही. कदाचित, असंही असेल, सुरुवातीला मी माझाच आवाज दाबला, मला मुकं केलं आणि… आणि कालांतराने लोकांना माझ्या मुकेपणाचीच सवय झाली असेल. इतकी, की माझं अस्तित्व पूर्णपणे नाहीसं झाल्यावरसुद्धा कोणाला जाणवलंही नाही. म्हणूनच, कदाचित… कदाचित, माझी हाक कोणालाही ऐकू गेली नसेल. माझ्या रंध्रारंध्रातून घुमलेली आरोळी फक्त माझ्याच नसांनी, पेशींनी ऐकली असेल. किंवा सवयीनीच; पण, कदाचित त्यांनीही दुर्लक्ष केलं असेल, कुणास ठाऊक!
असो, मी फारच नकारात्मक सूर लावला ना? पण, मी म्हणलं ना, बऱ्याच दिवसांनी असं बोलायला, व्यक्त व्हायला मिळतंय म्हणल्यावर वहावत जायला होतंच! पण, सारखा रडका सूर न लावायचा मी आत्ताही प्रयत्न करेन. माझं अस्तित्व असताना मी जसं केलं असतं, अगदी तसंच- हसतमुख राहायचा प्रयत्न!
खरं सांगायचं तर, माझ्या लहानपणीच्या आठवणी एकदम उफाळून येतायत. त्यातलीच एक. माझं आणि आईचं खूप घट्ट नातं होतं. अतूट. म्हणजे निदान तेव्हातरी. ती मला लहानपणी नेहमी सांगायची- बाळा, मला ठाऊके तुझं माझ्यावर प्रेमे! पण, म्हणून आता काय माझ्या पाप्या घेऊन माझा जीव घेशील? आई असं म्हणाली, की मला वारेमाप हसू यायचं. असं असतं का कुठे? आपण तर किती प्रेम करतो आईवर! आपल्या प्रेमामुळे का तिचा जीव जाणारे? आणि मुळात, कोणी कोणावर प्रेम केलं म्हणजे जीव जातो थोडीच? प्रेम केल्याने तर जीव लावण्याची महती कळते, एखाद्यावरून जीव ओवाळून टाकणं म्हणजे काय ते कळतं, जीवाला जीव देणं म्हणजे काय त्याचा प्रत्यय येतो, एखाद्याच्या जवळ असण्याने जीवात जीव आल्यासारखा किंवा जीव भांड्यात पडल्यासारखा वाटतो, नाही का! बापरे! हे एकदम एखाद्या लेखकासारखंच अलंकारिक वगैरे झालं, नाही का! असो. पण, हे असलं सगळं माझ्या मनात येऊन जायचं. खोटं नाही सांगत, अगदी खरं. मग काय, एवढं सगळं मी आईला सांगितलं, की ती फक्त 'कळेल तुला' असं लटक्या फणकाऱ्याने म्हणायची. मीही हे सगळं हसण्यावरी नेत असे. पण, तिचं हे 'कळेल तुला' मला इतक्या वर्षानंतर समजेल असं वाटलं नव्हतं. आणि ज्या अवस्थेत समजलं, त्याची कल्पना करणंही अशक्य आहे. ज्या व्यक्तीवर इतकं जीवापाड प्रेम केलं, ज्या व्यक्तीसाठी स्वतःच्या घराण्याची, जवळच्या नात्यांची राखरांगोळी करून अब्रूची लक्तरं वेशीवर टांगून सगळ्या अपमानाला, जाचाला, नरकप्राय यातनांना विनातक्रार सामोरं जात स्वतःचा आत्मसन्मान स्वतःच्या हाताने चुरडला; हक्काचं घर, खोली, बिछाना- सारं काही स्वप्नपूर्ती केल्यासारखं सजवलं; ज्याचं मन आणि शरीर रिझवण्यासाठी त्याच घरात स्वतःच्या शरीराचा वाटेल तसा बाजार मांडला, त्याच व्यक्तीच्या हातून, त्याच घरात, त्याच बिछान्यावर… सॉरी, पुन्हा लागलाच नाही का नकारात्मक सूर!
विषय बदलूया जरा, नाही का! माझ्या लहानपणी मी खूप गोष्टी वाचल्या होत्या. माझं मन तसं सगळ्याच कथा वाचण्यात रमायचं नाही. मला त्या रोमँटिक कथा, प्रेमाच्या गोष्टी सांगणाऱ्या, किंवा सारखे उपदेशाचे डोस पाजणाऱ्या बोधकथा वगैरे आवडल्या नाहीत कधी. लोकांच्या चुका दाखवून आपण कसं शिकलं पाहिजे वगैरे भरपूर उपदेश असायचा त्यात. पण, मला कायम वाटायचं, की थरारक काहीतरी असलं पाहिजे कथेत. कित्ती मज्जा येते नाही! हिरो बऱ्याच संकटांशी सामना करत, अनेक टक्केटोणपे खात, हालअपेष्टा भोगत स्वतःला हवं ते मिळवतो आणि मग सगळ्या जगाला असं ठणकावून सांगतो, 'बघा, मी जिंकलो! साल्यांनो, तुमच्या नाकावर टिच्चून तुम्हाला बोटं तोंडात घालायला लावली की नाही!' गोष्टीचा शेवट हा असा हवा. मग, असा शेवट असेल, तर कथेत हिरो-हिरोईनचं प्रेम वगैरे दाखवलं तरी हरकत नाही. शेवटी कथेत अखेरपर्यंत थरार, ताणलेली उत्कंठा वगैरे असायला हवी. थरार! शेवटपर्यंत थरार! बसल्या जागी खिळवणारा, थिजवणारा, धडकी भरवणारा, डोळे विस्फारायला लावणारा, शेवटचा श्वास घशातच अडकवणारा! पुढे काय होणार हे ठाऊक नसताना जेव्हा माणूस समोरचा प्रकार पाहू लागतो, तेव्हा काय मनोवस्था होते नाही! आपण जगणार का मरणार हेही ठाऊक नसतं आपल्याला. पुढ्यात उभ्या असलेल्या प्रसंगाला तोंड द्यायची मनाची तयारी झालेली नसते आणि तिथून पळ काढावा असं कितीही वाटलं तरी आयत्या वेळी सगळी गात्र त्याला साफ विरोध करतात. आणि मग हातात उरतं समोर जे जे घडेल ते पाहणं आणि दैव ज्या दिशेने वाहील त्या दिशेने वाहणं. जे घडतंय त्याचा शेवट कसा असणारे हे ठाऊक असतं; पण, तरीही तो कसा घडणार आणि कधी घडणार ह्याचीच वाट पाहणं नशिबी उरतं. प्रत्येकाच्या नशिबी कुठे असणार असला थरार? ज्यांना हा थरार अनुभवायला मिळतो, ते खरे भाग्यवंत!
मला कायम प्रश्न पडत आलाय. एखाद्याच्या अस्तित्वाची खूण कशी पटते? म्हणजे अमुक एखादा माणूस ह्या जगात आहे किंवा होता हे खात्रीशीररित्या सांगण्यासाठी मापदंड कुठले असतात? मला माहितीये, हा प्रश्नच फार विचित्र आहे खरं तर. म्हणजे माणूस अस्तित्वात आहे का नाही हे कशासाठी आणि का ठरवायचंय? कशाला असल्या जंजाळात अडकायचंय विनाकारण- असले प्रश्न अनेकांना पडतील. साहजिक आहे. कारण, रोजच्या आयुष्यात हे असले खटाटोप करायचे प्रसंग फार लोकांच्या माथी लिहिलेले नसतात. ज्यांच्या प्राक्तनात ते लिहिलेले असतात त्यांना ह्या प्रश्नामधलं गांभीर्य चटकन् कळेल. आपलं अस्तित्व जेव्हा सिद्ध करावं लागतं, जेव्हा ओरडून ओरडून ते पटवून द्यावं लागतं- अन् हे एकदा नव्हे, वारंवार- तेव्हा मनाला होणाऱ्या यातना व्यक्तही करता येत नाहीत. माझ्या बाबतीतही अगदी हेच घडत आलं. हो, पण ह्यात माझीच चूक झाली हेसुद्धा मान्य करावंच लागेल. कारण, मीच माझं अस्तित्व बदलायचा प्रयत्न केला, माझ्या 'असण्यावर' मीच घाला घातला आणि ज्यांना ह्याचा फायदा मिळायचा तो मिळालाच. माझ्या सगळ्या कल्पनांना छेदत, स्वतःलाच खोटं ठरवत मी माझी ओळख बदलली. म्हणजे मीच माझ्या 'असण्याला' खोटं ठरवलं! अर्थात, ज्या व्यक्तीसाठी हे सगळं करायचं ठरवलं, त्या व्यक्तीला तर नेमकं हेच हवं होतं. हो! मीच माझं अस्तित्व नाकारणं. एकदा का माणसाने स्वतःचं अस्तित्व नाकारलं, की जगाने त्याचं असणं मान्य केलं काय किंवा न केलं काय- काहीही फरक पडत नाही. त्याची खूण ही त्याचं नाव न राहता पुरावा क्रमांक अमुकअमुक एवढीच उरते. माझंही तसंच झालं. मी म्हणलं नाही का! एक्झिबीट नंबर- एवढीच काय ती ओळख. आणि तीसुद्धा फक्त शरीराला उरलेली. कारण, शरीराचे तुकडे मिळत जातील तशी त्यांना ओळख मिळत जाईल. आणि छत्तीस एक्झिबीटची मिळून एक कुठलीतरी 'बॉडी' तयार होईल. म्हणजे थोडक्यात काय तर सगळे तुकडे एकसंधपणे जोडले गेल्यावरसुद्धा ओळख फक्त 'बॉडी क्रमांक' एवढीच राहणार. म्हणजे आत्म्याचं अस्तित्व नाहीच. ह्या शरीरामध्ये कधीकाळी एखादा जीव राहत होता ह्याची खूण पटणार नाहीच कधी!
सूड, राग, संताप- ह्या सगळ्या भावना माणसाच्या मनात किती खोलवर रुजलेल्या असतात ना? आणि गंमत म्हणजे जगभरात सगळीकडे ह्या भावना सारख्याच दिसतात. माणसाचं बाह्य रूप बदलतं, भाषा बदलतात, जात-धर्म-लिंग सगळं बदलत जातं; पण, सूड-राग-संताप असल्या भावनांची विकृती काही बदलत नाही. बहुदा माणसं विकृतीची वेगवेगळी पातळी गाठायची स्पर्धा करतात एकमेकांशी. तरस, कमोडो ड्रॅगन वगैरे प्राणी मला अत्यंत क्रूर वाटायचे. कारण ते आपल्या सावजाला शक्य तेवढ्या यातना देतदेत उदरभरण करतात. म्हणे हे प्राणी त्यांचं सावज जिवंत असतानाच खायला लागतात. मला तरी हे फारच यातनामय वाटायचं. पण, माणसांची मजल मात्र ह्यापलीकडे जाऊन पोहोचलीये. शरीराला दिलेल्या यातना पुरेनाशा झाल्या म्हणल्यावर आत्म्यालाही जास्तीतजास्त त्रास कसा भोगावा लागेल ह्याची खबरदारी घेतली जाऊ लागलीये. मान्यय, अगदी मान्यय- वैर आहे, तेढ आहे; पण, माणूस मेला तरीसुद्धा वैर संपू नये? तरीही सूड घेणं थांबू नये? आणि सूड घेण्याच्या पद्धती तरी किती नवीन! त्या सगळ्या पद्धती ऐकल्या, की असं वाटतं मेलेल्याला पुन्हा गळा घोटून मारा हवं तर; पण, हा सूड नको! परंतु, हे सांगायची मुभा सावजाला नसते. आणि असलीच, तरी सूड घेणाऱ्याच्या मनावर असतं सूडचक्र कधी थांबवायचं ते! ह्या प्राण्यांचं नाही का? त्यांच्या सावजाला कितीही वाटलं, आता मरण यावं; तरी ते मरण देण्याचं औदार्य मात्र शिकाऱ्याच्याच हातात असतं. तसंच हेही.
असो. माझ्याबद्दल अनेकांनी अनेक प्रकारे लिहिलेलंच आहे. आणि नुसतं नाही, तर अगदी रसभरीत वर्णन केलंय. मृत्यू कसा झाला, कोणी खून केला, खुनापूर्वी काय घडलं, खुनानंतर कायकाय झालं- अगदी सगळं. हे सगळं इतकं रंजित होतं, की माझ्या तोंडून वास्तव ऐकणंही सपक होईल. आणि मी ह्या सगळ्याला काही दोष नाही देत. रोज मरे त्याला कोण रडे? आज एक केस समोर आली म्हणून तरी लोकांना आश्चर्य वाटलं असेल किंवा शरीराचे पस्तीस तुकडे केले म्हणून तरी. उद्या पस्तीसचे पन्नास होतील, एक्झिबीटची एकूण संख्या वाढून बॉडी क्रमांक बदलतील. खूनाची पद्धतही बदलेल. पण, ह्या सगळ्या मागे दडलेली विकृती, सूडभावना, संताप- सारं काही तसंच राहिल. कदाचित, मृत व्यक्तीचं लिंग, धर्म, जातसुद्धा बदलेल. मग कोणीतरी लेखक त्या व्यक्तींच्या वतीने शब्दांचे जड अलंकार जडवून भावनांच्या ओझ्याखाली वाहणारी अशीच पत्रही लिहील आणि त्या जोरावर भरगोस प्रसिद्धीही मिळवेल. पण, ह्या सगळ्या सत्रानंतर माझ्यासारखंच कोणीतरी 'निनावी', 'अनामिक', 'अमुक शहरातली केस' किंवा तत्सम नावाने ओळखलं जाईल. म्हणजे त्याचाही टाहो, आक्रोश वगैरे जे काही असेल ते असंच कुठेतरी पत्रात बंदिस्त होईल. तात्पर्य काय, तर अशीच अनामिक पत्र येत राहणार आणि वेगवेगळ्या ढिगाऱ्यात धूळ खात पडून राहणार! पुढे मागे त्याचं काही झालंच तर चांगलंय, नाहीतर…असो. आज फारच नकारात्मक सूर लागतोय. बास आजपुरतं. पुढच्या अनामिक पत्रातून गाठभेठ होईलच…
तुमचा/तुमची,
अनामिक कोणीतरी
By Amey Sachin Joag
Comentarios