By Dr Snehal Gorde
हो.. माहीत नाही मी कशी वागेन! खूप चिडेन. रागवेन.तुझ्या शर्ट ची कॉलर पकडून तुला जाब विचारेन.का मला एकटीला सोडून गेलास? का परत एकदाही मागे वळून पाहिलं नाही? का मला नाकारलं? का ? का? माझा राग आणि अश्रू एकत्र आले की तू कासावीस होतोस.तू मला सावरशील.माझे डोळे पुसून माझा चेहरा हातात घेऊन शांत करशील.
माझे डोळे पाहून विचारशील,डोळ्यांच्या कडा एवढ्या काळया कशा? खरं मी सांगू शकणार नाही आणि तुझ्याशी मला खोटं बोलता येणार नाही.पण तू समजून घेशील.मला मिठीत घेशील आणि तिथेच मी विरघळून जाईन.सगळा राग गळून पडेन. इतके दिवस दाबून ठेवलेले हुंदके धक्काबुक्की करत बाहेर येतील.माझ्या अश्रूंची भाषा तुला कळते. तूही मौनातच माझं सांत्वन करशील.माझ्या दुःखातले त्राण कमी झाल्यावर हळूवार माझ्या डोक्यावरून हात फिरवशील.माझी विचारपूस करशील.बोलता बोलता हलकेच तुझे ओठ माझ्या माथ्यावर टेकवशील. घट्ट मिठीत पकडुन मला पूर्ण शांत करशील. एखादा बाष्फळ विनोद सांगून माझं हसू मला परत आणून देशील.
थोड्या वेळाने जायला निघशील.पण या वेळी मी जाऊ देणार नाही.धरून ठेवेन माझ्या हृदयाशी.अगदी तसूभरही हलू देणार नाही.पण.....................
पण परत भेटल्यावर यातलं काहीच होणार नाही.या वास्तवाच्या वणव्यात होरपळून निघालेल्या माझ्या मनातल्या कल्पनांना कुठेच वाव नाही याची मला पूर्ण जाणीव आहे आणि यातलं काहीच होणार नाही म्हणूनच तुला भेटायची भिती वाटते.माहीत नाही मी कशी वागेन! कदाचित काहीच बोलू शकणार नाही. तशीच निघून जाईन.जसे माझे मोडके तोडके शब्द कळतात तसे हे अबोल शब्द कळतीन का तुला?
By Dr Snehal Gorde
Comments