By Keyur Joshi
आज उकडत होतं खूप, सकाळपासून.
40 डिग्री तापमानातसुद्धा सकाळच्या कोवळ्या उन्हात बसायची हौस काही फिटत नव्हती.
खिडकीतून उगाच डोळ्यांसकट मनही डोकावत होतं, सारखं..
बेचैन होतो जरा; उकाड्यामुळेच कदाचित,
पण मग नजर स्थिर झाली समोरच्या मैदानावरच्या त्या छोट्याश्या खड्ड्यातल्या चिमण्यांवर, एका क्षणात; जणू काही वीज चमकावी तशी, अचानक...
एक क्षण सुद्धा जास्तच होईल, एक पळ; कदाचित..
त्यांना मातीत लोळताना पाहून मलाही जरा गुदगुदल्याच झाल्या,
संकेत मात्र स्पष्टपणे पावसाचेच होते.
“आज पाऊस पडणार” बाबांचाही आवाज आलाच कुठूनतरी
कधी कधी खात्री पटते ह्यांनाही मिळाली असावी ही superpower, चिमण्यांसारखी...
इतक्यात वाराही आलाच कुठूनतरी
आधी एक मंद झुळूक, मग घोंगावत आणि पुन्हा शांत, स्तब्ध.
मनाचंही असंच असतं, नाही?
कधी अगदीच शांत, कशाला उद्याची बात म्हणत,
तर कधी अगदीच सैरभैर, ह्याच वाऱ्यासारखं.
वादळाची चाहूल मात्र दोन्हीकडे सारखीच.
मग आपोआप बंद होतात दारं आणि खिडक्या,
पण वारा मात्र शिरतोच.
कधी एखाद्या उघड्या दारातून राजाप्रमाणे,
तर कधी एखाद्या खिडकीच्या फटीतून, चोरासारखं.
पण तो येतोच, नको असलेल्या विचारांसारखा.
मग ढगही जमा होतात हळू हळू...
हळूहळूच पण सातत्याने.
त्या वाऱ्याशी स्पर्धेला आहे कुणीतरी हे ते पटवून देतात
ढगांची दाटी होऊन त्यांची घनता वाढते म्हणूनच त्यांना ‘घन’ म्हणत असावेत कदाचित.
ह्या ढगांचेही घन झालेच,
अगदी कुणीतरी आर्त स्वरात ‘येरे घना येरे घना’ म्हणावं आणि त्यांनी त्याचं ऐकावं, अगदी तसंच.
आणि शेवटी तो आलाच.
ती सर हलकीच होती, भुरभुर म्हणा हवंतर.
इतकी हलकी की दवबिंदू आणि त्या सरीच्या थेंबात गोंधळ उडावा, इतकी.
जरा हिरमोड झाला माझा.
व्यापून ते अवघं आकाश तरी बरसण्यात कसला हा कंजुषपणा?
द्यावं त्यानेही झोकून स्वतःला त्या धबधब्यासारखं आणि होऊन जावं मोकळं.
खोडून टाकावं अंतर जमीन अस्मानातलं आणि भिजवून टाकावा मातीचा कण अन् कण.
भलं मोठं अवसान आणून नुसता आश्वासनांचा खेळ का करावा?
माणसाळला असावा बहुतेक तोही.
किंवा असावा तोही खचलेला आणि विचारली असावी मातीने खुशाली, म्हणून मुसमुसत असावा.
व्यक्त होता येत नसेल कदाचित.
प्रश्नांना आणि विचारांना अंत नाही.
ऐकलात तो विजेचा आवाज?
पट्टीच्या गवय्याने सोहनीत तान घ्यावी तशीच कोसळली कुठेतरी.
किंवा खरेंच्या शब्दात, “नभ फाटून वीज पडावी” अगदी तशीच.
माझं बोलणं लावून घेतलं असावं त्याने मनाला.
जोर वाढवला त्याने.
मला पावसाळा आवडत नाही तसा.
पाऊस म्हणजे चिकचिक, पाऊस म्हणजे उदासवाणं वातावरण, पण ते घराबाहेर पडल्यावर.
घरात बसून पाऊस बघायचा आनंद काही औरच.
पण तो आज व्यक्त होत होता.
कधीपासून शांत होता, कुणास ठाउक
ढगांनी किती धक्के पचवले, कोण जाणे.
अव्यक्तचा व्यक्त होताना धक्के बसतात, साहजिकच.
धक्के बसतात, साहजिकच,
आणि आज वादळाचा दिवस आहे.
का शांत असतो माणूस उगाच गरज नसताना?
मनं सांभाळणं गरजेचं असतं का प्रत्येकवेळी?
का गृहीत धरतो दुखावलेलं मन, दुखवलेलं नसताना
आणि नाकारत जातो स्वतःतला बदल, तो दिसत असताना
कदाचित तोही पडला नसावा खाली खड्डे पडतील म्हणून पण वादळानंतरच्या नुकसानीला जबाबदार नक्की कोण?
धरेने गृहीत धरलेल्या पावसाला, पाऊस जबाबदार किती?
ह्या गुदमरण्याला आपण कारणीभूत तेवढेच जेवढं त्या त्रासाची सहानुभूती स्वतःला दिली जाते, नाही?
अव्यक्त जिवात आणि दगडात फरक उरतो तो फक्त, श्वासांचा.
त्याला ते उमगलं असावं बहुतेक.
समोरच्या मैदानातलं ते छोटंसं खड्डं भरलंय आता.
एव्हाना थांबला होता तो.
भानावर आलो होतो मी सुद्धा.
प्रश्नही संपले होते.
आणि खिडकी उघडली होती.
त्याने स्वतःला थांबवलं असलं तरी काही थेंब थांबत नव्हते.
अलगद झेललं त्यांना तळव्यावर तेव्हा दारंही उघडली कुणीतरी
मनाचीही आणि घराचीही.
ओल्या रस्त्यांवर बागडत होतो मी सुद्धा.
भिजलो जरासा घरात बसल्या बसल्या.
पावसाशी ओळख झाली जरा नव्यानेच.
जो येऊन गेला तो जितका पाऊस तितकंच प्रतिबिंब होतं,
माझं आणि कित्येक मनांचं.
पाऊस आज असाही भिजवून गेला,
पाऊस, आज आरसा झाला.
By Keyur Joshi
Oh My ❤️
Waa waa ❤️
Kdk😍😍
beautiful ❤️
Waa😍😍😍