By Dr Snehal Gorde
"अजून किती दिवस तू अडकून राहणार आहेस? Just move on.विसरून जा.काय मिळणार आहे त्या आठवणीत राहून?"चहाचा कप तिच्या हातात देत तिच्या मैत्रिणीने विचारलं.मैत्रिणीची काळजी तिला कळत होती.पण काय उत्तर देणार?काय सांगणार काय मिळणार होतं तिला त्या आठवणीत राहून? इतक्यात त्या टपरीवरच्या रेडिओवर गाणं सुरू झालं.,
लगन लागी तुम से मन की लगन
गली-गली घूमे दिल तुझे ढूंढें
गली-गली घूमे दिल तुझे ढूंढें
तेरे बिन तरसे नयन
लगन लागी तुम से मन की लगन
त्याने तिला रेडिओ वर हे गाणं लागलंयं ऐक लवकर, असं सांगितलं आणि हे पहिलं गाणं जे त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी पण एकत्र ऐकलेलं होतं.ते गाणं ऐकून तिच्या चेहऱ्यावर एक हलकीशी स्माईल आली. विसरून जा पण कसं आणि काय विसरून जा?
त्याच्यामुळे तिला ती भेटली होती. त्याच्या असण्याने तिला तिची झालेली ओळख ती कशी विसरणार? तो होता तेव्हा तिच्यात काय आहे आणि तो गेला तेव्हा तिच्यात काय नाही,हे तिला कळालं होतं,ते कसं विसरणार? खूप काळ एकत्र राहिलेली माणसं एकमेकांसारखी होऊन जातात. त्यांच्या आवडीनिवडी एकमेकांच्या आवडीप्रमाणे बदलत जातात.तसंच काहीसं तिचं झालं होतं.
नदी समुद्रात मिसळली की तिच्यातून तिचं पाणी वेगळं कसं काढणार? त्यात समुद्राचा खारटपणा येणारच. माणसाचं तसंच आहे.जी माणसं आपल्याला अंतर्बाह्य बदलतात.त्यांचा काही अंश आपल्यात येणारच.जीव ओवाळून टाकावा अशा व्यक्तिवर जिवापाड प्रेम केल्यावर त्याला कसं विसरायचं? त्याची जागा दुसऱ्या कोणाला कशी द्यायची? प्रत्येकाची आपल्या आयुष्यातली जागा ठरलेली असते.कोणी कोणाची जागा घेऊ शकत नाही. ज्याच्यासोबत सगळ्यात सुंदर क्षण घालवले ते पुसून कसे टाकायचे?लोक म्हणतात काळाच्या पडद्याआड माणूस गोष्टी विसरतो पण काही माणसं ही विसरण्यापलिकडची असतात..आणि मुळात विसरायचा प्रयत्नच का करायचा? ज्याने आपल्याला एक चांगला माणूस म्हणून घडवलं,ज्याने जगण्याचा अर्थ शिकवला,ज्याने नकळत माझ्यातला माणूस जगवला, त्या माझ्या जीवनाच्या शिल्पकराला मी का विसरू?उलट हे सगळं जपून ठेवणे ही तिची जबाबदारी आहे असं मानून ती तिने आनंदाने स्वीकारली होती.कारण ती फक्त भाळली नव्हती तिला हे सगळी सांभाळायचं होत.
आणि तिने त्याला एक promise केलं होतं..मी जगेन..तुझ्याशिवाय ही.त्याने दिलेल्या या आयुष्याला एक छान आकार देईन.पडत ,धडपडत ,कधी चालत, कधी पळत ,कधी अडखळत..पण जगेन ..शेवटी जे त्याने दिलंय ते त्याचं त्याला परत द्यायला हवं. जे आहे ते त्याचं च तर आहे.तिच्या मनात थोड्या वेळापूर्वी ऐकलेल्या गाण्याच्या ओळी वाजू लागल्या.,
तेरा तुझको सौंप दे,
क्या लागत है मोर्!
मेरा मुझमें कुछ नहीं,
जो होवत सो तोर!
"सांग ना ,अजून किती दिवस तू अडकून राहणार आहेस?" मैत्रिणीने पुन्हा विचारलेल्या प्रश्नाने ती भानावर आली..आणि चहाचा एक घोट घेत ती हसऱ्या चेहऱ्याने उत्तरली, "जोपर्यंत विसरत नाही तोपर्यंत.."
By Dr Snehal Gorde
Comments