By Amey Sachin Joag
मर्तिकाला नाचणारी आमुची बाई जमात ग
टाळूवरचं लोणीदेखील खातो एका दमात ग ||धृ||
कोणी सहायतेस देतो हाक, आम्ही हसतो मोठ्याने
मदत आमुची सारी ऑनलाइन केवळ एका बोटाने
लोकांच्या मदतीसाठी हा केवढा मोठा अट्टाहास
परोपकारादेखील येतो आताशा स्वार्थाचा वास
घोषणाच वाहती नुसत्या आता रगारगात ग
मर्तिकाला नाचणारी आमुची बाई जमात ग ||१||
स्वच्छतेत्सुक माणूस येथे सदैव धनी टीकेचा
विद्याविभुषितांच्या हाती सतत कटोरा भिकेचा
कुपोषित या साऱ्या मागण्या, विकृत आणिक विचार
परजीवांवर उपजण्याचा हा पूजनीय विकार
सूविचारांवरि लागते आताशा ही जकात ग
मर्तिकाला नाचणारी आमुची बाई जमात ग ||२||
रंध्रारंध्रामधून धावतो रक्ताआगोदर हा द्वेष
सूडभावना सदैव जागृत जरी निजती सारे क्लेश
दुफळी माजवा खळगी भरा असे नारा सर्वांचा
नीचाहूनही नीच चेहरा स्वातंत्र्योत्तर पर्वाचा
आत्मक्लेशे भिजते धरा अश्रूंच्या धारात ग
मर्तिकाला नाचणारी आमुची बाई जमात ग ||३||
चिवडून पार चोथा झाला या साऱ्या विषयांचा
कसले घर? उरला आधार आता केवळ आशांचा
झाले गेले विसरून जाऊ करूया साऱ्यांना माफ
पुढे जाऊ म्हणत चालू, पुढचा रस्ता आहे साफ
वर्ग हा पांढरपेशा परिवर्तनाच्या भ्रमात ग
मर्तिकाला नाचणारी आमुची बाई जमात ग ||४||
By Amey Sachin Joag
Comentários