top of page

माझी राणी

By Amol Kharat


मी तिचं माकड आणि ती माझी माकडीण ….एकाच फांदीवर धावताना पावलं आमचे वेगवेगळे ...पानात रेंगाळताना, फांद्यांना कवटाळताना शेपटाही आमच्या वेगवेगळ्या ...पण आमचं हिंडणं , खेळणं, खाणं , भांडणं सगळं सोबतच ……..आम्ही फक्त एकमेकांचे.…वाऱ्याभवती ,उन्हाच्या उजेडात  आणि रात्रीच्या गारव्यात ...झाडांखालीच आणि कधी फांद्यांवर …...पण ही झाडं  आमचं घर नाहीये ...बोलत नाही कोणीही आम्ही आपसात ...फक्त जगत असतो ….पण सोबत एक नवीनच भर पडलीय ,माणसाची …...माणसे यायला लागलेत आता इकडं ...आम्ही बघतो ..त्यांच्या गाड्यात आमचं घर नसलेले झाड तोडून ,भरून घेऊन जाताना… .या गाडीचं आम्हाला कौतुकच. पण माझी माकडीन राणी आणि मी तिचं माकड राजा ..आम्ही एकदा  त्या माणसांच्या गाडीचा पिच्छा केला ……..आणि पोहोचलो थेट……... त्या झाडांची रोपं लावणाऱ्या माणसांच्या गर्दीत. इकडं पानं आणि फांद्याच दुर्मिळ...जसे हे माणसं आमच्याकडं…  त्या गर्दीत आम्ही भरकटलो आणि ज्या गाडीचा पिच्छा करत आलो तीच गाडी या गर्दीत गायब झाली……भूक लागली आम्हाला…. ती माणसांची  गर्दी त्यांच्या पदार्थांच्या लाचेसोबत आमच्याकडे येऊ लागली . त्यांना राणी आणि मी आकर्षण …....खायला फेकत होते आमच्याकडे ते…. खाताना अन् झेलताना आम्हाला त्या गर्दीची भीती कमी होत होती….आणि  आकर्षण वाढत होतं .राणी त्या  गर्दीत रमू लागली अन् तिच्या रमण्यात मीही …..

            इमारती चढताना आणि उतरताना आमच्या शेपट्या खांबांना आवळू लागल्या  ..आम्ही बदल होतो माणसांसारखंच वागू बघत होतो ….. आमचे भांडण कमी झाले ….खेळ कमी झाले …सोबत खाणंही कमी झालं .पण तरीही आम्ही सोबतच होतो ….आम्ही सुरक्षित होतो .आणि हि सुरक्षितता. आमच्या साठी दुरावा निर्माण करू लागली …….राणी आता एकटीच हिंडू लागली . पानात ...माझ्या पोटात घुसणारी राणी आता माणसात बिंधास राहू लागली ….पावसात भिजून माझ्या जवळ येणारी राणी आता पावसाला दुरूनच बघू लागली .…

        इथं सूर्य मावळतचं नाही ...अदृश्य होतो फक्त ..अन मग हि गर्दीही जरा कमी होते ….राणीसारखाच चंद्रही कधीतरी दिसतो …. एखाद्या इमारती आड . मग बराच वेळाने…… न मावळलेला सूर्य उगवताना दिसतो … मग विशिष्ट इमारतींवर भोंगे वाजयला लागतात अन काही इमारतींच्या आतून घंट्यांचा आवाज येऊ लागतो ….मग गर्दी हळू हळू वाढायला लागते ….अन मी हे सगळं उपाशी पोटी बघत असतो….कळत नसलेल्या घड्याळातील काटे एका विशिष्ट जाग्यावर येण्याची वाट बघत .



कारण जेव्हा खायला मिळतं त्यावेळी इमारतीवरील घड्याळाचे काटे त्या जागेवर जराशे मागे पुढे असतात हे राणीनं ध्यानात आणून दिलं होतं …..…या गर्दीला खूप न्याहाळल्यावर कळंल …कि या गर्दीने स्वतःहून स्वताःभवती त्या घड्याळासारखी खूप गर्दी जमा केलीय … अन या मुळेच बहुतेक इथं गर्दी एक नाहीये …..इथं गर्दी फक्त एकत्र असते ...आणि विशेष वेळी हि गर्दी एकत्र नाचताना , खेळताना अन भांडताना हि दिसते ….. इथं कोणीही कोणासोबत हिंडतं असतं . जसा राणी आणि मी ….राणी आणि मीही भांडतो …पण यांनी एकमेकांना मारून टाकल्याचंही पाहिलंय मी .   तेव्हा पासून या गर्दीला मी घाबरून राहायला लागलो ...इथं राहायचं तरी अजून किती माहित नव्हतं…...आणि अचानक ती गायब झालेली गाडी मला दिसली…. आणि त्या गाडीमागे राणी धावताना...मग मीही राणी मागे धावलो …माझी राणी आणि मी ...सोबत त्या गाडीचा पिच्छा सुरू केला…….आम्ही थकत होतो … तरीही पिच्छा करत होतो ……..बऱ्याच वेळाने आम्ही त्या गाडीमागून येऊन पोहोचलो थेट…. आमचं घर नसलेल्या झाडं , फांद्यां ,अन् पानांच्या गर्दीत….खूप दिवसांनी परतलो होतो … जणू ह्या फांद्या अन पानं हि आमचीच वाट बघत होते .आमचा वेग कमी झाला .. आम्ही म्हातारे झालो नव्हतो तरी थकलो होतो .मग हळुवार पानात घुसलो आणि अलगद ….शेपट्यांनी त्या फांद्यांना कवटाळले …...आम्हाला भूक लागली नव्हती पण काहीतरी कमी पडत होतं …. तेही समजत नव्हतं …...आम्ही शांत झालो, एकमेकांच्या जवळ आलो आणि अचानक जाणवलं…………. …….आम्ही खूप दिवस एकमेकांना स्पर्शच केला नव्हता . आणि हे जसं -जसं जाणवू लागलं  तसतसा आमचा आज स्पर्श चढू लागला……..या पानांनी आणि फांद्यांनी डोळे मिटून घेतले… सूर्याने स्वतःला विझवलं……. आणि गार…... लहरी सोबत रात्र आली ….पानांतून चंद्र डोकावताना …….……………...मी वर ………...आणि राणी खाली……

पाखरांचा कल्लोळ सुरु झाला...आणि डोळे उघडले …..आणि जो भास त्या माणसांच्या गर्दीतून ,गायब झालेली  गाडी दिसल्यापासून  सुरु झाला होता ….तोही संपला.      पण त्या गाडी माग राणी धावत असल्याचा भास का झाला होता मला ? …..माहित नाही ,पण आज खूप दिवसांनी सकाळ अनुभवत होतो … पाखरांच्या खेळासोबत दिवस उजाडण्याची गंमत बघत होतो ….एकटाच ,कारण त्या भोंग्यांच्या अन घंटांच्या आवाजासारखीच  राणी ही त्याच गर्दीतच राहिली होती …….खरतर राणीला आवडलीच होती ती गर्दी … सुरक्षित होती राणी त्या गर्दीत …असो… पण राणीचा हा भास बहुतेक राणीनेच घडवून आणला असावा ….कारण तिला जाणवलं असणार कि मला हि गर्दी आवडत नव्हती ..राणी होती ती माझी … मी राजा आहे म्हणून नाही तर ती माकडीण आहे म्हणून . आमची सोबत महत्वाची नाहीये ...आम्हाला जगणं महत्वाचंये …. हा फक्त माझा एकतर्फी विचार नाहीये … प्रेम करतो आम्ही एकमेकांवर खूप .. आणि प्रेमाचेच अवयव आहेत भास .. स्वप्न … अन कल्पना ...त्यांचं काम आम्हाला कसही जोडून ठेवायचं आणि याच प्रेमाच्या भरवश्यावर राणी त्या गर्दीत बिन्धास हिंडतीय माझ्याविना अन आता इथं मी ,माझ्या राणी विना … तिचे भास झेलत ….

कुठून येतात हे भास ? हे बघताना मी आभाळाकडे पाहिलं अन एका फांदीने अडवलं आणि मला दाखवलं तिच्या पाठीवर कसं एक मोहळ येऊन बसलंय ….गावाचं ते सारं सोबत .. गर्दीच माणसांसारखी पण हि गर्दी एकत्र होती प्रत्येक क्षणाला … एकचं काम त्यांचं ….गोडपणा गोळा करणं ..राणीच्या भासासारखं ….मग कळालं कि राणीचे भास गोळा करण्याचं काम करणारी अशीच एक गर्दी आहे माझ्या भवती. पण ती गर्दी मला दिसत नाहीये … असो मला नाही बघायचीय हि गर्दी … मला त्या गर्दीने गोळा केलेला गोड भास ह

वाय ….

फांदीला शुभेच्छा देऊन मी ओढ्याकडं निघालो … या फ़ांद्यांच्याच मुळ्यांची हि खरतर करामत आहे ..आणि हा ओढा नेहमी वाहता आहे … इथं कोणीही स्थिर नाहीये त्या इमारतींसारखा अन त्या इमारतीत राहणाऱ्या मांणसासारखा इथं कोणी अस्थिरही  नाहीए …. वेडीचे राणी … काहीही आवडतं तिला … पण राणीला आवडलं म्हणल्यावर भारी असणार ते ,माणसांच अस्थिर पण …. 

      पण आता मला स्थिर व्हायायचंय …..अस्थिर ओढ्याच्या काठावरील स्थिर दगडांवर बसून त्याची  संथता साठवून घ्यायचीय …..अंगावर अलगद गळून पडणाऱ्या पाचोळ्याचं  वाऱ्यात मिसळणं बघायचंय….त्या खळखळत्या प्रवाहात स्वतःला न्याहाळायचंय …. उजेडाचं तरंगणं …. जणू पसरणं … राणीच्या कल्पने सारखंच कवटाळायचयं …..राणीही कवटाळत असेल त्या माणसांच्या गर्दीतील सौंदर्य … करीत असेल त्यांच्या नकला . पण मलाही आता हे भवतीच सौंदर्य न्याहाळायचंय …. अन त्या उजेडासारखं सूर्यातून येऊन ,सूर्यालाच विसरून त्याच्याच निर्मितीला सजवत पसरायचंय राणीला विसरून . राणी सूर्य नाहीय माझा पण तिचा सहवास सूर्यासारखाच माझ्यातुन तिच्या विचारांचा उजेड उत्सर्जित करत आहे …. करू दे ….मला हा उजेड उधळून आता स्वतःचा सूर्य बनायचंय . सूर्य कसा बनला असेल ? मला आता त्याच्याचमूळ बनलेल्या गोष्टी न्याहाळाव्या लागणारे आता … मग बहुतेक 

त्याचं बनण्याचं कारण कळेल …. मग बघू त्या कारणातूनच डोकावून …. डोकावतानाहि कळेल नुसतं डोकवल्याने दिसणारे का उतरावं लागणारे त्यात .


By Amol Kharat



Recent Posts

See All

Comentários

Avaliado com 0 de 5 estrelas.
Ainda sem avaliações

Adicione uma avaliação
SIGN UP AND STAY UPDATED!

Thanks for submitting!

  • Grey Twitter Icon
  • Grey LinkedIn Icon
  • Grey Facebook Icon

© 2024 by Hashtag Kalakar

bottom of page