By Dr Snehal Gorde
आता रात्री मला झोप येत नाही.आजकाल असं बऱ्याचदा होतं.कारण आपला संवाद होत नाही.मग त्याच खिडकीत जाऊन उभी राहते.वाऱ्याची एक हलकी झुळूक जेव्हा माझ्या केसांच्या बटा वेगळ्या करण्याचा प्रयत्न करते,तेव्हा माझं मन तुला साद घालतं.काळाच्या गतीलाही मागे सोडत तू येतो आणि त्या क्षणाचा ताबा घेतो.तुझ्या स्मिताचे मोती चोहीकडे विखुरले जातात.
तू दिवसभराचा आढावा घेतो.संपूर्ण दिवसात कुठेतरी मी हिरमुसलेली असतेच.तू माझी समजूत काढतो.आपलं मन कसं रुष्ट न करता ती वेळ निभवायची ते सांगतो.मग तू तुझ्या प्रशंसेच्या बागेत फेरफटका मारायला घेऊन जातो.तिथे तुझ्या स्तुतिसुमनांचा माझ्यावर अविरत वर्षाव होतो. हा बगीचा मला सर्वांत आवडीचा. कारण या उपवनाची अभिषिक्त सम्राज्ञी फक्त मी आहे..
उत्तर रात्री तू मला कवेत घेतो.माझ्या केसांतून फिरणाऱ्या तुझ्या अंगुळी माझ्या तनामनाला शांत करतात. खिडकीतून डोकावणारी ती रातराणी मात्र माझा द्वेष करते.कारण तिच्या त्या फुललेल्या सौंदर्याकडे आणि मधाळ सुगंधाकडे माझं आजिबात लक्ष नसतं.तुझ्या स्पर्शाबरोबर मी कधीच त्या अभ्रांवर स्वार होऊन त्या तारकांच्या जगतात गेलेली
असते.तेव्हा माझं मन तुला काय सांगत असतं माहीत आहे?
सांग कशी तुजविनाच, पार करू पुनवपूर?
तुज वारा छळवादी, अन् हे तारे फितूर!
श्वास तुझा मालकंस, स्पर्श तुझा पारिजात!!
सखया रे, आवर ही सावर ही चांदरात!
त्या शांततेच्या क्षणी माझे नेत्र दगा द्यायला लागतात..हे तुझ्या लक्षात येताच तुझ्या बाहुपाशाची दुलई माझ्या गात्राभोवती गुंडाळतो..हळूवारपणे मला निद्रेच्या स्वाधीन करून तू चोरपावलांनी निघून जातो.
पहाटे द्विजांच्या कलरवाने माझा निद्राभंग होतो.माझी नजर तुला शोधत राहते.तिथे ना तुझ्या पाऊलखुणा ना तुझ्या आलिंगणाची रजई.तुझ्या अस्तित्वाची एक ही खूण मला सापडत नाही.कारण त्या भास्कराच्या आगमनाबरोबर माझ्या जादुई स्वप्नांची दुनिया लोप पावते.रोज रात्री पडणाऱ्या या स्वप्नाच्या आठवणी माझ्या अधरावर हास्याची एक लकेर उमटवत आलेल्या दिवसाला सामोरे जाण्याची ताकद देते.रात्री पुन्हा येण्याचे वचन देऊन..
By Dr Snehal Gorde
Comments